छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता युरो) मांडकी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील चैतन्य कानिफनाथ मतिमंद आश्रम शाळा येथे मतिमंद विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अत्याचारप्रकरणी संबंधित संस्थाचालक व कर्मचाऱ्यांविरुद्ध जेजे अॅक्ट २०१५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समाजमाध्यमांवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये एका मतिमंद मुलाला मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत होते. या व्हिडीओच्या आधारे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन आश्रम शाळेची पाहणी केली असता, तेथील विद्यार्थ्यांची अत्यंत दयनीय आणि विदारक अवस्था समोर आली. सदर प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्यात चौकशी करूनही जेजे अॅक्ट २०१५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही, असे समजते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी मा. पोलिस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) यांना लेखी निवेदन देऊन अधिनियमातील कलम ७४, ७५ व ८५ नुसार संबंधित संस्थाचालक व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अमित वाहूळ यांनी केली आहे.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, मानवतेला काळीमा फासणाऱ्या या कृत्याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. तसेच बालकल्याण समितीमार्फत संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात यावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.















